Ad will apear here
Next
सिनेमाचे दिवस
चित्रपटांचे आकर्षण नाही असा माणूस सापडणे मुश्कील; मात्र तो कसा बनतो, त्यासाठी किती लोकांचे कष्ट व प्रतिभा पणाला लागते, त्यात कशा व किती अडचणी येतात, एवढे होऊनसुद्धा त्याचे आणि पर्यायाने निर्मात्याचे भवितव्य कसे अधांतरी असते, हे आपल्याला माहीत नसते. करसल्लागार अरुण गोडबोले यांनी चाळिसाव्या वर्षी निर्माता बनून या क्षेत्रात उडी घेतली. त्या क्षेत्रातील अनुभव गोडबोले यांनी ‘सिनेमाचे दिवस’ या पुस्तकात लिहिले आहेत. सामान्य मराठी कुटुंबातील व्यक्तीने या मायावी चित्रनगरीत कसे यश मिळविले, हे यातून समजते. या पुस्तकातील ‘ट्रायल शो, प्रेस कॉन्फरन्स आणि इंटरव्ह्यू’ हे  प्रकरण येथे प्रसिद्ध करत आहोत.
....
सिनेमाची ट्रायल बघायची उत्सुकता माझ्याइतकीच माझ्या रोज भेटणाऱ्या मित्रांनाही होती. तांदूळ आळीत रोज संध्याकाळी आम्ही पाच-दहा मित्र आप्पा निगडीकरांच्या दुकानात जमत असू. कोणी व्यापारी, कोणी नोकरदार, कोणी डॉक्टर, तर कोणी माझ्यासारखा करसल्लागार असे आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील होतो. आपला व्यवसाय व मोठेपणा विसरून तासभर गप्पा, काव्यशास्त्रविनोद असा मस्त फड जमायचा. दिवसभराचे सर्व ताणतणाव संपून जायचे. ही मैत्री आजही गेली ३०-३५ वर्षे अशीच टिकून आहे. साताऱ्यातील अनेकांनी आमच्या त्या ग्रुपला तांदूळ आळी मित्रमंडळ, सुगंधी कट्टा, टेन डाउनिंग स्ट्रीट, राज्यसभा अशी विविध नावे ठेवलेली, नव्हे, दिलेली आहेत; पण साताऱ्यातील अनेक चांगल्या सार्वजनिक व सांस्कृतिक उपक्रमांचा प्रारंभ या गप्पांमधूनच झालेला आहे. तर या सर्वांनाच इच्छा होती, ती मुंबईला जाऊन ट्रायल पाहायची व नंतर निर्मात्याच्या म्हणजे माझ्या खर्चाने पार्टी उकळायची. 

मी या बेताला खुशीने होकार दिला; पण हळूच एक मेख मारली, ‘तुम्ही सर्व मुंबईत आल्यापासून परत मुंबई सोडेपर्यंतचा सर्व खर्च माझा; पण लग्नाच्या वऱ्हाडासारखे तुम्ही तुमच्या खर्चाने यायचे जायचे,’ असे मी म्हटल्यावर त्या सर्वांनीच हा कोकणस्थी कावा ओळखूनही त्याला होकार दिला. स्वत:हून मदतीचा हात पुढे करणारे अरविंद डांगे व मधुअण्णा कुलकर्णींनाही आवर्जून निमंत्रण दिले. ही सर्व मंडळी सकाळी निघून दुपारपर्यंत पोचणार होती; पण पूर्वतयारीसाठी मी व किशोर नावंधर आदल्या दिवशी रात्रीच निघून पहाटे गुलमोहोरला डेरेदाखल झालो. 

तेथूनच एकेकाला फोन करायला सुरुवात केली. रमेशजी, अजिंक्य व शेखर नवरे ट्रायलला येणार होते. तसेच माझे साडू बाबा गोखले व चुलत भाऊ तात्या गोडबोले हेसुद्धा सहकुटुंब येणार होते; पण ते सर्व पुढे थांबणार नव्हते. निवेदिता शूटिंगसाठी परगावी गेली होती. भाई रांजणकर, प्रेमा किरण, वैद्यसाहेब, विसू व अनिल ही सर्व मंडळी ट्रायल व नंतर पार्टीसाठीही थांबणार होती. राजा कारळे यांनीही दहा बारा पत्रकार ट्रायल व प्रेस पार्टीलाही येत असल्याचे सांगून त्यांना देण्यासाठी स्टिल फोटोग्राफ्सची व्यवस्था करायला सांगितले. 

मी ‘नेब्युला’त कधी गेलो नव्हतो. त्यामुळे हे सगळे मिळून आपण पंचवीसच्या आसपास लोक होऊ, तेव्हा तेथे तेवढा मोठा हॉल आहे ना, हे राजाभाऊंना विचारल्यावर त्यांनी काही काळजी करू नका म्हणून सांगितले. नेहमीप्रमाणे सिद्धिविनायक दर्शन, मग उडपी रेस्टॉरंट करून बाँबे लॅबला पोचलो. होसी वाडियांशी मधल्या काळात चांगले संबंध प्रस्थापित झाले होते. म्हणून ते व मिसेस वाडिया या दोघांनीही यावे, म्हणून आग्रहाचे निमंत्रण दिले. ‘मी सहसा ट्रायल व पार्टीजना कधीच जात नाही; पण तुमच्या ट्रायलला एकटाच थोडा वेळ येईन. नंतर पार्टीला मात्र आम्ही दोघेही निशिचत येऊ,’ असे म्हणत त्यांनी प्रेमाने ते निमंत्रण स्विकारले. वैद्यसाहेब व त्यांचे ‘जयविजय’ संध्याकाळच्या ट्रायलच्या पूर्वतयारीत मग्न होते. त्यांच्याशी बोलून आम्ही गुलमोहोरला परतलो, तर दारातच आमचे सातारचे वऱ्हाड मेटॅडोरमधून उतरत होते. 

माझी कल्पना की ते वाटेत पनवेलला जेवून आले असतील, म्हणून त्यांना म्हटले ‘या! वर गुलमोहोरमध्ये थोडी विश्रांती घ्या, मग चारला चहा घेऊन बाँबे लॅबला जाऊ.’ 

‘छे छे विश्रांती कोठली? आधी जेवणाची व्यवस्था करा मग विश्रांतीचे बघू,’ असे आमचे त्यातील सर्वांत ज्येष्ठ आठवले मॅनेजर म्हणाल्यावर आणि त्यावर सर्व जण हसल्यावर मला अर्थबोध झाला; पण तरीही मॅनेजरनी तो पुन्हा ‘आपले काय ठरले होते? मुंबईत आलो की तुझा खर्च चालू. आम्ही जेवायला मध्ये कशाला थांबतोय? आता मुकाट जेवणाची सोय कर,’ असे म्हणत आणि कशी जिरवली या विजयी मुद्रेने अर्थ स्पष्ट केला. शेवटी तेही माझेच मित्र होते. माझ्याइतकेच तयार असणार की! मी निमूटपणे सर्वांना मस्त जेवण दिले; पण ते संपून मी बिल देईपर्यंत त्यांनी माझी चेष्टा काही थांबवली नाही. 

सर्व मंडळी वेळेवर बाँबे लॅबमधील गॅलॅक्सी या मिनी थिएटरला आली. ते सर्वार्थाने सुंदर होते. ‘मंजुनाथ मूव्हीज प्रस्तुत कौशिक चित्र’ या पहिल्या पाटीपासून मी एकाग्र चित्ताने पाहत राहिलो. समर्थ रामदासांनी ‘आनंदवन भुवनी’ या काव्यात ‘स्वप्नी जे देखिले रात्री। ते ते प्रत्यक्ष होतसे’ असे म्हटले आहे. त्याचाच प्रत्यय मला येत गेला. गेल्या तीन-चार महिन्यांत आम्ही सिनेमाची संकल्पना करताना त्यातील सीन्स कसे असावेत, गाणी कशी वाटावीत हा नुसता कल्पनेचा इमला उभा करीत होतो. तो आज प्रत्यक्ष रूप घेऊन पडद्यावर साकार होत होता. साताऱ्यातील निसर्ग, मंदिरे पडद्यावर उठून दिसत होती. अजिंक्य, निवेदिता वगैरे सर्व प्रथितयश कलाकारांची कामे तर उत्तम होतीच; पण साताऱ्यातील हौशी कलाकारही कोठे कमी पडले नव्हते. ते सर्व पाहता पाहता मध्यंतर कसा आला हे समजलेसुद्धा नाही. मध्यंतरात चहाची व्यवस्था होती. तेव्हा सर्वांच्याच तोंडी सिनेमाचे कौतुक होते. 

वाडिया म्हटल्याप्रमाणे मध्यंतरापर्यंत थांबून व माझे अभिनंदन करून गेले. सर्व सातारकर मित्र, कराडहून आवर्जून आलेले मधुअण्णा व भरत शहा या सर्वांनाच जणू आपलाच सिनेमा छान होतोय, असा आनंद झालेला होता. अजिंक्य, रमेशजी, शेखर नवरे या सर्वांनीही माझे आणि त्याहून जास्त मायेने पितांबरचे अभिनंदन केले. आम्ही केलेल्या अभिनयाला तू उत्तम सादर केले आहेस असाच त्यांचा सूर होता. आलेले पत्रकारही समाधानी होते. राजाभाऊंनी ‘ते सर्व थांबतायत म्हणजेच सिनेमा त्यांना आवडतोय. नाही तर हळूच काढता पाय घेऊन ते एकदम नेब्युलात आले असते,’ असं सांगून मला प्रोत्साहन दिले. भाई रांजणकर मात्र तेवढेसे समाधानी दिसत नव्हते. त्यांनी बोलून दाखविले नाही; पण ते असमाधान त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत होते आणि मला कोड्यात टाकत होते. त्यांनी ‘चांगला वाटतोय’ असे सांगितले खरे; पण ते मनापासून नसल्याने मला उगीचच चुटचुट लागली. त्यांनी पितांबरला मात्र बाजूला घेऊन ‘काळे, तुम्ही उद्या सकाळी माझ्या घरी १० वाजता नक्की या म्हणजे आपण चर्चा करू,’ असे सांगितले. पितांबरने ते मला सांगितल्यावर माझी चुटचुट आणखीच वाढली.

मध्यंतरानंतर सिनेमा पुन्हा सुरू झाला, तो मला तरी चढत्या क्रमाने रंगत गेला असे वाटले आणि संपल्यानंतर बहुतेकांनीही तसेच मत व्यक्त केले. प्रेस पार्टीसाठी न थांबणारे सर्व जण भेटून गेले आणि आम्ही म्हणजे पत्रकार, सातारकर मंडळी व मी, पितांबर, वैद्यसाहेब असे ‘नेब्युला’साठी प्रस्थान ठेवले. राजाभाऊंनी टॅक्सी बोलावून पत्रकारांची सोय केली. सातारकरांनी मेटॅडोर व रस्ता दाखवायला विसू अनिल आणि मधुअण्णांच्या गाडीने दोन खेपा करून आम्ही राहिलेले नेब्युलाला पोचलो. 
तेथे गर्दीचीच वेळ होती; पण मधला हॉल त्यांनी राखून ठेवला होता; पण आम्हा २४-२५पैकी तेथे मुश्किलीने १५ जण बसू शकणार होते. यातून मार्ग काढायचा म्हणजे सातारी भाषेत चक्क दोन पंगती करणे भाग होते. 

पत्रकारांचा मान पहिला असल्याने सातारकरांना थांबविण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. बरं तसे थांबायलाही हॉटेलमध्ये जागाच नव्हती. मग नाईलाजाने ही मंडळी बाहेर फुटपाथवर घोळका करून गप्पा मारत थांबली आणि आत पत्रकारांशी वार्तालाप सुरू केला. राजाभाऊंच्या स्नेहामुळे लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, रसरंग वगैरे महत्त्वाच्या वृत्तपत्रांचे प्रतिनिधी आले होते. त्यांना बुकलेट्स, फोटो दिले आणि सिनेमा मी का काढला, कसे अनुभव आले वगैरे मी सविस्तर सांगितले. तेही सर्व जण मुरब्बी होते. त्यांनीही अनेक प्रश्न विचारले; पण सुदैवाने मी दिलेल्या उत्तरांनी त्यांचे समाधान होत गेले. हे सर्व चालू असतानाच त्यांची पार्टी व जेवणही क्रमाक्रमाने होत राहिले. त्या पत्रकारांत लोकसत्ताचे प्रतिनिधी म्हणून शरद गुर्जर हे ज्येष्ठ सिनेपत्रकार होते. त्यांनीच या सगळ्या वार्तालापात खूप इंटरेस्ट घेतला. तो कार्यक्रम संपवून बाहेर पडताना त्यांनी मला बाजूला बोलावले आणि म्हणाले, ‘मीही मूळ सातारचाच आहे. आम्ही तुमच्या घराजवळ देवी चौकातच राहात होतो व तुमच्या वडिलांना मी ओळखतो आणि तेही आमच्या घरी येत असत. त्यामुळे मीही सातारकर व असल्याने मला हा आपलाच सिनेमा वाटतोय. मी प्रसिद्धीकडे व्यवस्थित लक्ष देईन. तुम्ही त्याची काळजीच करू नका.’ मलाही ते ऐकून आनंद वाटला. 

बाहेर आमचे सातारकर मित्र मंडळ चांगलेच वैतागले होते. त्यांना वाटत होते, की त्यांना बाहेर ठेवून मी आत मस्त एंजॉय करतोय. आठवले मॅनेजरनी या सगळ्याचा स्फोट केला. ते म्हणाले, ‘आम्हाला इथे हातात बॅग देऊन तू आत बसलायस. आमच्या वयाचा तरी मान राखायचास!’ त्यांना आत नेऊन त्यांच्याबरोबर मीही जेव्हा जेवण मागविले, तेव्हा त्यांना पटले की हा आत नुसता बोलतच होता, खात-पीत नव्हता आणि मगच त्यांचा राग शांत झाला. 

हे सगळे आवरल्यावर आम्ही परत गुलमोहोर गाठले. मी व किशोर नावंधर मागे थांबलो आणि त्यांना संतुष्टपणे मेटॅडोरमधून सातारला रवाना केले. 

(अरुण गोडबोले यांनी लिहिलेले ‘सिनेमाचे दिवस’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी किंवा ई-बुक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZMLCH
Similar Posts
एका वेड्या व्योमचराची गोष्ट! केवळ आपल्या हौसेखातर चाळिशीत विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन एकच इंजिन असलेले विमान अमेरिकेतून दिल्लीपर्यंत चालवत आणण्याचा विक्रम सतीशचंद्र सोमण यांनी १९९४मध्ये केला होता. त्या थरारक प्रवासाचे वर्णन करणारे ‘एका वेड्या व्योमचराची गोष्ट’ हे सोमण यांचे पुस्तक अलीकडेच बुकगंगा पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झाले
Valentine's Day : ‘ही’ हस्ताक्षरातील प्रेमकविता नक्की वाचा! आज व्हॅलेंटाइन्स डे... मिलिंद जोशी यांच्या ‘असंच होतं ना तुलाही’ या कवितासंग्रहातील ही प्रेमकविता नक्की वाचा...
यशस्वी चित्रपटांचे निकष ‘पटकथा लेखनाचा अभ्यास करताना मी गेल्या ८० वर्षांतल्या गाजलेल्या आणि मी पाहिलेल्या सुमारे १०० चित्रपटांची यादी केली. प्रत्येक चित्रपट कोणत्या ‘गुणां’मुळे गाजला, त्याचा विचार केला. त्यावरून ‘यशाचं नेमकं गमक काय?’ हे शोधण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही गणिती सूत्रानं यशस्वी चित्रपटाची निर्मिती करता येत नाही,
बॅ. नाथ पै : ओजस्वी वक्तृत्व, तेजस्वी नेतृत्व आज (१८ जानेवारी २०२१) बॅ. नाथ पै यांचा ५०वा स्मृतिदिन. यंदा त्यांचे जन्मशताब्दी वर्षही सुरू आहे. कोकणी जनतेने आपल्या ह्या लाडक्या नेत्याला अनेक बिरुदांच्या आभूषणांनी भूषविले. अगदी ‘लोकशाहीचा कैवारी’पासून ‘अनाथांचा नाथ’पर्यंत एक ना अनेक; पण त्या सर्वांत ‘वक्ता दशसहस्रेषु’ हे आभूषण नाथ पैंना जिरेटोपासारखे शोभून दिसायचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language